छत्रपती संभाजीनगर,(सांजवार्ता ब्युरो): दारी झेंडूच्या फुलांचे तोरण, अंगणात सडा रंगोळी काढून पारंपरिकतेचे दर्शन घडवीत आज दसरा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. घरोघरी दसरा सणाचा उत्साह आहे. बाजारात देखील खरेदीची धूम आहे. त्यामुळे यंदाचा दसरा व्यापारीवर्गासाठी उत्तम ठरला आहे. वाहन, घर, सोनं तसेच इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीची सध्या बाजारात धूम आहे.
साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे दसरा. दारी झेंडूची फुले, पानाफुलांचे तोरण, सडा रांगोळ्यांनी आज पहाटेपासूनच आंगण सजले. चैतन्यमय वातावरणात आज घरोघरी मोठा उत्साह आहे. सायंकाळी घरोघरी पूजन करून एकमेकांना आपट्याची पाने देऊन शुभेच्छा देण्यात येणार आहे. त्यासाठी घरोघरी तयारी करण्यात आली आहे. तसेच अनेकांनी वाहने, सोनं, इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीसाठी आजचा दसऱ्याचा मुहूर्त साधला आहे. तसेच अनेकांनी नवीन व्यवसायाची सुरुवात देखील आजच्या दिवशी पूजन करून केली. तसेच आज घरोघरी झेंडूच्या फुलांची मोठ्या प्रमाणावर मागणी केली आहे. यंदा झेंडूची फुले मोठ्या प्रमाणावर मार्केटमध्ये विक्रीसाठी आणली गेली आहे. जालना, फुलंब्री, बीड, आष्टी, हिंगोली या ठिकाणाहून झेंडूची फुले विक्रीसाठी आणली गेली आहेत. सकाळी 80 ते 100 रुपये प्रति किलो झेंडूची फुले विक्री झाली तर हळूहळू दर घसरण होऊन 50 ते 70 रुपये प्रति किलो झेंडूची फुले विक्री झाली. याशिवाय आज सायंकाळी रामलीला मैदान येथे 70 फुटी रावण आणि 65 फुटी कुंभकर्णचे दहन कार्यक्रम आयोजित केला आहे. तसेच मयूरनगर, टीव्ही सेंटर आणि वाळूज या ठिकाणी देखील आज सायंकाळी रावण दहन करून दसरा साजरा केला जाणार आहे.
सराफा मार्केटमध्ये आठ कोटी ते दहा कोटींची उलाढाल होण्याची अपेक्षा
दसऱ्याच्या निमित्ताने सोनं खरेदीला अंत्यत महत्व दिले जाते. यावर्षी देखील महत्व कायम आहे. परंतु यंदा सोन्याचे दर पहाता जणू गगनाला भिडले आहे. त्याचा परिणाम आणि पडलेला मुसळधार पाऊस यामुळे यंदा सराफा मार्केटवर परिणाम होऊ शकतो. मात्र असे असले तरी ज्यांना पाच ग्रॅमचे सोनं खरेदी करायचे आहे ते तीन ग्रॅम सोनं खरेदी करत आहे. परंतु सोन्याचे दर वाढत असल्याने अनेकांनी सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यावर देखील भर दिला जात आहे. यंदा सोन्याचे दर पाहिले तर 1 लाख 17 हजार एव्हढे आहे. तर चांदीसाठी 1 लाख 50 हजार मोजावे लागत आहे. यावर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर आठ कोटी ते दहा कोटींची उलाढाल होईल. अशी अपेक्षा सराफा असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र मंडलीक यांनी दैनिक सांजवार्ताशी बोलताना व्यक्त केली.
तीन ते साडे तीन हजार टू व्हीलरची विक्री
जीएसटी कमी झाल्याने वाहन खरेदीचा फायदा झाला. दहा ते पंधरा हजार रुपयांने किंमती कमी झाल्या झाल्या आहेत. पाच वर्षात पहिल्यांदा वाहनांच्या किंमती कमी झाल्या आहेत. आतापर्यंत वाहनांच्या किंमती वाढतच चालल्या होत्या. परंतु यंदा जीएसटी कमी झाल्याचा फायदा ग्राहकांना झाला. त्यामुळे दुचाकी आणि चार चाकी वाहन खरेदी वाढली आहे. आमच्याच शोरूममधून पाचशे टू व्हीलर आज दसऱ्याच्या निमित्ताने खरेदी होत आहे. शहरात अशा जवळपास दसऱ्याच्या निमित्ताने तीन ते साडे तीन हजार टू व्हीलर विक्री होणार आहे. तसेच जवळपास पंधराशे फोर व्हीलर शहरात विक्री होईल. असे अरिहंत होंडाचे संचालक राहुल मिश्रीकोटकर यांनी स्पष्ट केले.
फोर व्हीलरला वाढली मागणी; बऱ्याच वाहनांना वेटिंग
दसऱ्याच्या निमित्ताने ऍडव्हान्समध्ये वाहनांची बुकिंग केली होती. आज सकाळपासून वाहने घेण्यासाठी ग्राहकांनी शोरूममध्ये गर्दी केली. त्यामुळे वाहन बाजारात खरेदीची धूम आहे. दसऱ्याच्या निमित्ताने फोर व्हीलरची मागणी सध्या वाढली आहे. त्यामुळे बऱ्याच वाहनांना वेटिंग करावी लागणार आहे. असे असले तरी मात्र एका शोरूम मधून 70 ते 80 फोर व्हीलर जवळपास खरेदी करण्यात आल्या आहेत. व्हीक्टोरिन ही नवीन गाडी लॉन्च झाली आहे. त्याची मागणीही जास्त आहे. परंतु त्याला वेटिंग आहे. तसेच आर्टिका तसेच स्विफ्ट डिजायर, ब्रिजा या फोर व्हीलरला देखील सर्वाधिक मागणी केली आहे. मात्र या फोर व्हीलरला देखील वेटिंग आहे. सध्या जीएसटी कमी झाल्याने फोर व्हीलरची मागणी वाढली आहे. अशी माहिती पगारिया ऑटोचे व्यवस्थापक अमोल तित्तर पाटील यांनी दिली.